उद्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी राज्य सज्ज
राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी आज तालुका पातळीवर निवडणूक कर्मचऱ्यांना ईव्हीएम यंत्र आणि निवडणुक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातल्या १८१ ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यात धुळे तालुक्यातल्या ६६ ग्रामपंचायतीच्या मतदान साहित्याचं वाटप धुळे शहरातल्या तांत्रिक विद्यालयात करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे शिरपूर, साक्री अणि शिंदखेडा तहसिल कार्यालयातही इव्हीएम यंत्र आणि निवडणुक साहित्याचं वाटप केलं जात आहे.
भंडारा जिल्ह्याच्या १४८ ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी ४६८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. तसंच ५२६ मतदान केंद्राध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ५७८ कर्मचारी, सहाय्यक म्हणून वर्ग ४ चे ४८१ कर्मचारी आणि कायदा आणि सुव्यवस्था संभाळण्या करिता ५१२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातल्या ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होत असून पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. निवडणूकी दरम्यान कोणी गुंडगिरी केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या १५३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाही उद्या होत असून त्यासाठी ईव्हीएम तपासणी, मतदारसंघनिहाय मतदार यादी, पोलीस बंदोबस्त आदी बाबीची तयारी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या ग्राम पंचायतींच्या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचत आहेत.
रायगड जिल्ह्यातल्या ७८ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत असून जिल्हा प्रशासनानं मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. मुदत संपलेल्या ८८ ग्रामपंचायींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित ७८ ग्रामपंचायतींसाठी २९९ मतदान केंद्रावर उद्या मतदान होणार आहे.
Source – AIR
