गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात उद्या मतदान
गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात, तसंच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणूक पारदर्शी,मुक्त वातावरण आणि कोविड सुरक्षित वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगानं चोख व्यवस्था केली आहे. गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्यात उद्या होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गोव्यात एकाच टप्यात ११ लाख ६४ हजार २२४ हून अधिक मतदार ३०१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये ८२ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या ८१ लाखांहून अधिक मतदार मतदान करू शकतील. राज्यात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम यादीनुसार राज्यात ८१ लाख ७२ हजार १७३ मतदार असून त्यापैकी ४२ लाख ३८ हजार ८९० पुरुष, ३९ लाख ३२ हजार ९४५ महिला आणि २८८ ट्रान्सजेंडर मतदार आहेत. राज्यात एक हजार पुरुष मतदारांमागे ९२८ महिला मतदार आहेत.
Source-AIR
