गणेशोत्सवात संकलित ६२.४८५ टन निर्माल्यापासून निर्माण होणा-या नैसर्गिक खतातून नवी मुंबईतील उद्याने फुलणार
नवी मुंबई, दि. २१: ७ सप्टेंबर पासून अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्रीगणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांना पर्यावरणमित्र म्हणून प्रशस्तिपत्र देत गौरविण्यात आले तसेच १३७ इतक्या मोठ्या संख्येने बनविलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करणा-या नागरिकांनाही सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या निर्माल्य कलशातच टाकावे या आवाहनालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. श्रीगणेशोत्सवातील पाच विसर्जन दिवसांमध्ये २२ नैसर्गिक व १३७ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात ६२.४८५ टन ओले निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य संकलित करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र निर्माल्य वाहतुक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशोत्सवात श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनस्थळी वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.
अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत गौरींसह सहाव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी सर्वाधिक २७.६६५ टन तसेच अनंतचतुर्दशीदिनी दहाव्या दिवसाच्या विसर्जनप्रसंगी ११.७१० टन आणि दीड दिवसांच्या विसर्जनदिनी १०.९४५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत एकूण ६२.४८५ टन इतके निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनाव्दारे तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. यामधून उद्याने फुलविली जाणार आहेत. यामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने धारण तलाव, कोपरखैरणे याठिकाणी तेथील तसेच कोपरी व महापेगाव तलाव येथील फुलांच्या पाकळ्यांचे निर्माल्य आणले जाऊन निर्माल्यापासून खतनिर्मिती कार्यवाही करण्यात येत आहे.
पर्यावरणशील दृष्टीकोन जपण्यात व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात नवी मुंबईकर नागरिक नेहमीच सक्रिय सहभागी होत असून नवी मुंबईचा पर्यावरणशील शहर म्हणून नावलौकिक वृध्दींगक होत आहे. गणेशोत्सवातील निर्माल्यापासून खतनिर्मिती हा त्या पर्यावरणशीलचेचाच एक भाग आहे.
