खासगी रुग्णालयात परवडणाऱ्या दरात उपचार करण्याच्या आदेशाला राज्य सरकारकडून २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
मुंबई: राज्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं खासगी रुग्णालयात परवडणाऱ्या दरात उपचार करण्याच्या आदेशाला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळं या रुग्णालयांना अजूनही कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करावेच लागणार आहे.
आरोग्य विभागानं हा सुधारित आदेश काढला आहे. हा आदेश २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लागू राहणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरिटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांमधल्या तरतुदींच्या अनुषंगानं खासगी रुग्णालयांना राज्य सरकारनं काढलेल्या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडे याचे नियंत्रण करण्याचे अधिकार राज्यसरकारनं दिले आहेत.
