राज्यभरातील इंग्रजी शाळा आज बंद
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी, राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी स्कुल सेक्युरिटी ऍक्ट लागू करावा, अशा मागण्यांसाठी आज राज्यातील 4 हजार 500 खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळा बंद राहणार आहेत.
या बंदला मुंबई स्कूल बस असोशिएशननेसुद्धा पाठिंबा दिला आहे. पण या शाळांमध्ये परीक्षा मात्र सुरळीत सुरू राहतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
1 नोव्हेंबर 2018 चा शासन निर्णय रद्द करावा, 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयात सुधारणा करावी, शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी मुख्याध्यापकाऐवजी शालेय वाहतूक व्यवस्थापनावर सोपवावी, मोफत गणवेश, पुस्तके इत्यादी पुरविण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांचा दर्जा वाढण्यासाठी तातडीने ऑनलाइन सुविधा सुरू करावी आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. राज्यातील खासगी इंग्रजी शाळांच्या या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील १४ हून अधिक शालेय संघटना यात सहभागी होणार असल्याचे इसाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितले.
