पंजाब मध्ये आप ने केले सर्वांना चकित
लखनऊ: अखेर तो दिवस उजाडला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली असून ४०३ जागांपैकी जवळपास सर्व जागांचे कल स्पष्ट झाले आहेत. यात सर्वात जास्त चुरशीच्या ठरलेल्या उत्तर प्रदेशात भाजप ने पुन्हा एकदा मुसंडी मारली असून जवळपास २६४ जागी भाजप आघाडीवर असून १२६ जागांवर समाजवादी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर लढत देत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे बहुजन समाज पार्टी व काँग्रेस ला १० जागांवरही आघाडी घेता आलेली नाही. शिवसेने बाबत बोलायचे झाले तर इथे शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याचे आलेल्या निकलांवरून स्पष्ट झालेले आहे. या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सभा घेत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जो सध्याच्या कलांवरून फोल ठरल्याचे दिसते आहे.
तर दुसरीकडे उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या राज्यांच्या मतमोजणीकडे नजर फिरवल्यास काँग्रेस येथेही पिछाडीवर गेल्याचे स्पष्ट दिसते आहे. यात पंजाब मध्ये आप ने मारलेली मुसंडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. थोड्याच वेळात सर्व जागांचे निकाल स्पष्ट होतील.
