राज्यातल्या विधानपरिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज समाप्त
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यामध्ये लोकभारतीच्या प्राध्यापक किशोर वरभे यांच्यासह सहा अपक्षांचा समावेश आहे. येेेथे भाजपाचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी निवडणूक रिंगणात आहेत.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी एका उमेदवारानं नामनिर्देशनपत्र मागे घेतलं. त्यामुळे आता २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात भाजपाचे नितीन धांडे आणि शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे निवडणूक लढवत आहेत.
पुणे पदवीधर मतदार संघात ७८ वैध अर्जांपैकी १६ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ६२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड निवडणूक रिंगणात आहेत.
तर पुणे शिक्षक मतदार संघात ५० उमेदवारांपैकी १५ जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे प्राध्यापक जयंत आसगावकर आणि भाजपाचे जितेंद्र पवार यांच्यासह ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीकरीता आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४५ वैध अर्जांपैकी १० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीत आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामधे भाजपाजे शिरिष बोराळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांचा समावेश आहे.
