शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील शाळांत शिकवणारे १०९ शिक्षक सन्मानित
मुंबई, दि. ५: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा आज मुंबईतील एनसीपीए सभागृहात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपण राज्यभरातील शाळांत शिकवणाऱ्या १०९ शिक्षकांना सन्मानित करत आहोत. शिक्षकांचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असून माणसाला घडवण्यात त्यांचा आई वडिलांएवढाच वाटा असतो. त्यामुळेच आज शिक्षकांना सन्मानित करताना आनंद होत असल्याचे मत याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यातील ३१०५ शिक्षकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा झाली असून त्याबद्दलही शासन सकारात्मक आहे. शिक्षकांवरील अन्य जबाबदाऱ्यांचा भार कमी केला जाईल असेही आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाला चांगला मंत्री मिळाला असल्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा, माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवता येणे शक्य झाले आहे. या सर्व उपक्रमांचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात उपस्थित होते.
