गणारायच्या आगमना निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यातील जनतेला शुभेच्छा
मुंबई, दि. १९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संदेशात म्हणतात की, “शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंदाचा हा उत्सव आपण उत्साहात, जल्लोषात आणि उत्सवाचं पावित्र्य राखून साजरा करूया. बाप्पांच्या सेवेत कुठेही कमी राहणार अशी आपण मनोभावे सेवा करतो.त्याचप्रमाणे आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊया. आपल्या परिसराची काळजी घेऊन हा उत्सव साजरा करूया. बाप्पांकडून सकारात्मक आणि नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया. बंधुभाव, सलोखा आणि परस्परातील प्रेम-आदर भाव वाढीस लागेल, असे उपक्रम आयोजित करूया, असे आवाहनही केले आहे.”
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याबाबत आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, “श्री गणेश चतुर्थी सणाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेची, समाजप्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळे, गणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील, समाजातील सर्वांनी मतभेद, मनभेद विसरुन, एकत्र येऊन, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदात, भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.”
गणरायाच्या आगमनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करत असताना समाजभान जपण्याचे व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेला गणेशोत्सव आता केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपण सर्वजण लाडक्या विघ्नहर्त्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. आपली संस्कृती, परंपरा व सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य या उत्सवाने केले आहे.
