नाराज एकनाथ शिंदे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यासोबत झाली चर्चा
सूरत, दि. २१ : शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरुद्ध बंड पुकारले असून ते अंदाजे ३५ आमदारांसह गुजरात मधील सूरत येथे तळ ठोकून आहेत. दिवसभर शिवसेना नेतृत्वामार्फत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक यांना नाराज शिंदे यांची भेट घेण्यासाठी सूरत ला पाठवले होते. अखेर त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांच्यामध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या चर्चे दरम्यान शिंदे यांचे उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यासोबत फोनद्वारे बोलणे ही झाल्याचे कळते.
यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना म्हणाले की मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं देखील समजत आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती समजत आहे. संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरं बोलत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आपण कोणत्याही पक्षासोबत चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीसोबत कोणताही ताळमेळ नाही, आमदार आणि मंत्र्यांचीही तीच भूमिका आहे. पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, त्यामुळे भाजपसोबत युती करणं हिच काळाची गरज आहे. असे म्हणत त्यांनी आपण आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मुंबईत या, आपण समोरासमोर चर्चा करू, चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेऊ, सर्वकाही सुरळीत होईल, तुम्ही चिंता करू नका असे त्यांना सांगितले.
