ज्ञानवापी मशिदीत पुरातत्व विभागातर्फे सुरु झालेल्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन दिवसांची स्थगिती
नवी दिल्ली, दि. २४: वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत भारतीय पुरातत्व विभागाने आज सकाळपासून सुरू केलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांची स्थगिती दिली. या सर्वेक्षणाला स्थगिती द्यावी, अशी याचिका मुस्लिम समुदायाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. वाराणसीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभागाने ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या कामाला आज सकाळी सुरुवात केली होती. या सर्वेक्षणासाठी पुरातत्व विभागाच्या ३२ जणांचं पथक सकाळी सातच्या सुमारास ज्ञानवापीत दाखल झालं होतं. या सर्वेक्षणाला मुस्लीम पक्षकारांचा विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी भारतीय पुरातत्व खात्याला ज्ञानवापी येथे वैज्ञानिक सर्वेक्षण २६ जुलैपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत न करण्याचे आदेश दिले. तसेच या संदर्भात मुस्लिम समुदायाच्या याचिकाकर्त्यांना पुढील उपायांसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना ही दिल्या आहेत. दरम्यान, ज्ञानवापी मशिद परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. ज्ञानवापी मशिदीतील वादग्रस्त वाजूखाना परिसर वगळून इतर भागाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. ४ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीवेळी सर्वेक्षणाचा अहवाल देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
