‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्या कारकिर्दीला १ वर्ष आणि एकूण कारकिर्दीला ६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला ६ वर्ष आणि नवीन टर्मला १ वर्ष पूर्ण झाले. या काळात कलम ३७०, राममंदिर, भारतीय नागरिकत्त्व कायदा, ट्रिपल तलाक यासारखे ऐतिहासिक निर्णय झाले. आयुष्मान भारत, गरिब कल्याण योजना, बँकांचे विलिनीकरण यासह अनेक योजनांमध्ये भरघोस प्रगती साधण्यात आली. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात सुद्धा मोठी मदत मिळाली.”
‘हे’ आहेत आजच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:
● निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान हे अतिशय मोठे आहे. पंचनामे झाल्यावर मदत जाहीर होईलच. पण, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात पुरामुळे गेल्यावर्षी प्रचंड नुकसान झाले, तेव्हा काही निर्णय आम्ही घेतले होते.
● ६८०० कोटींचे पॅकेज पश्चिम महाराष्ट्रातील हे जिल्हे आणि कोकणासाठी तेव्हा जाहीर करण्यात आले होते. प्रचलित नियमांच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेण्यात आले होते. तसेच निर्णय आता अपेक्षित आहेत.
● ज्यांनी कर्ज घेतले नाही, अशा शेतकर्यांना प्रचलित पद्धतीच्या तीनपट मदत देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला होता. बारा बलुतेदार, दुकानदार अशा सर्व घटकांना मदत देण्याचा निर्णय करण्यात आला होता. अशाच प्रकारचे निर्णय आज आवश्यक आहेत.
● देशात ३८४० रेल्वेगाड्या श्रमिकांसाठी सोडण्यात आल्या.
● पाच हजारावर महाराष्ट्रातील एमएसएमईंना ८०० कोटीहून अधिक रकमेचे कर्ज मंजूर. आरोग्य सेतू अॅप, १२० देशांना भारत आज औषधी पुरवितोय्. महाराष्ट्रात आता ३५ हजार चाचण्यांची दैनंदिन क्षमता.
● मुंबईत १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांपैकी ५६ टक्के चाचण्या मुंबईत होत्या. ३१ मे रोजी ते प्रमाण २७ टक्क्यांवर आले. म्हणजे चाचण्या झाल्या पण, मुंबईबाहेर. मुंबईत सर्वाधिक रूग्ण आढळत असताना मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवायला हवी.
● सांगतो ते करतो का, याचा राज्य सरकारकडून विचार आवश्यक! ८० टक्के बेडस केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना बेडस मिळत नाही, ही वास्तविकता आहे.
● ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. पण, खुल्या दिलाने ‘पुनश्च हरिओम’ पुढे न्यावे लागेल.
● परीक्षा घेण्यातील अडचणी आणि न घेण्यातील धोके यातून सुयोग्य मार्ग काढावा लागेल. भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील.
● राज्यातील आजची अवस्था ही केवळ पॉलिसी पॅरालिसिस नाही, तर अॅक्शन पॅरालिसिस सुद्धा आहे.
