जपान दौर्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली मानद डॉक्टरेट पदवी
मुंबई, दि. २२: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधल्या कोयासन विद्यापीठानं आज मानद डॉक्टरेट जाहीर केली. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य, आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न, इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. आगामी भारत भेटीत फडनवीस यांना ही उपाधी प्रदान केली जाईल, अशी घोषणा कोयासन विद्यापीठाचे अधिष्ठाता सोएदा सॅन यांनी केली आहे. जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरुन ५ दिवसांच्या दौर्यावर गेलेले फडनवीस काल टोकियोमध्ये पोचले. काल पहिल्या दिवशी टोकियोतल्या इंडिया हाऊसमध्ये प्रामुख्याने जी चर्चा झाली, त्यात अधिकाधिक जपानी कंपन्यांना महाराष्ट्रात आणणं, मराठी विद्यार्थ्यांना जपानमध्ये अधिक शैक्षणिक संधी आणि जपानमधल्या मराठी उद्योजकांच्या विकासासाठी पावलं उचलणं, इत्यादी विषयांचा समावेश होता.टोकियोहून फडनवीस यांनी शिकान्सेन बुलेट ट्रेननं क्योटोपर्यंतचा प्रवास केला. क्योटो इथं त्यांनी अनेक आघाडीच्या उद्योजकांच्या भेटी घेतल्या. जपानच्या उद्योजकांना महाराष्ट्रात अनेक उत्तम संधी आहेत, असं त्यांनी या उद्योजकांना संबोधित करताना सांगितलं.या दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि जपान यांच्यातले मैत्रीपूर्ण संबध आणि सहकार्य मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या दौऱ्यात फडणवीस पायाभूत सुविधा, आरोग्य, सामजिक क्षेत्रासह विविध प्रकल्पांबाबत चर्चा करतील, तसंच काही सामंजस्य करारही करण्याची शक्यता आहे.
Source – AIR
