अंबाझरी तलाव आणि नाग नदीसंदर्भात सुरू असलेल्या विविध आपत्ती निवारण कामांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
नागपूर, दि. २५: नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांद्वारे अंबाझरी तलाव आणि नाग नदीसंदर्भात सुरू असलेल्या विविध आपत्ती निवारण कामांची पाहणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी अंबाझरी तलाव आणि नाग नदीवर करण्यात येत असलेल्या दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजना जाणून घेतल्या. अंबाझरी तलावाचे बळकटीकरणाचे कार्य पूर्णत्वाकडे आलेले असून अंबाझरी तलावाजवळील पूलाचे एका बाजूचे काम लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले तर नाग नदीचे क्रेझी केसल, अंबाझरी दहन घाट, नासुप्र स्केटिंग रिंक, रामदासपेठ पूल येथील पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण कामाची पाहणी केली.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता पवार, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे यांच्यासह आपत्ती निवारणाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
