“जगातल्या सर्वात स्थिर मन असलेल्या महिला” या किताबाच्या मानकरी १०४ वर्षीय ब्राह्मकुमारी राजयोगिनी दादी जानकी यांच्या निधनावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
माऊंट अबू/राजस्थान: जगातल्या सर्वात मोठ्या अध्यात्मिक संघटनांपैकी एक असलेल्या बह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख प्रशासिका राजयोगिनी दादी जानकी यांचे मध्यरात्री २ वाजता वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झालं. आज सकाळी ११:५० वाजता माऊंट अबू येथे त्यांच्या पार्थिवावर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अनुयायांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबतचे एक छायाचित्र शेअर करत लिहिलंय की “ब्राह्मकुमारी च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांनी समाजाची मोठी सेवा केली आहे. दुसऱ्यांच्या जीवनात सकारात्मकता आणण्यात त्या सर्वात अव्वल स्थानी होत्या. महिलांना सशक्त बनवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय होते.”

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यानीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्विट केलं की, “ब्राह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच अत्यंत दुःख झालं. अध्यात्म , समाज कल्याण आणि विशेषत्वाने महिला सशक्तीकरण या क्षेत्रात त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. त्यांच्या अनंत अनुयायांप्रति माझी शोक-संवेदना आहे.”
दादिंबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्या जगातल्या एकमेव अशा महिला आहेत ज्यांना “मोस्ट स्टेबल माईंड इन वर्ल्ड” – (जगातली सर्वात स्थिर मन असलेली महिला) हा किताब मिळाला होता. १४० देशांत पसरलेल्या ब्राह्मकुमारी सारख्या आंतरराष्ट्रीय अध्यात्मिक संस्थेचे संचालन करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या मुख्य प्रशासिका होत्या. बालपणापासून भक्तिमय संस्कारात वाढलेल्या दादी जानकी यांनी योग विद्ये च्या माध्यमातून जगभर उल्लेखनीय कार्य केले. या संस्थेसोबत त्या १९३७ सालापासून जोडल्या गेल्या आहेत.
