सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यात गहू, हरभरा, मसूर, मोहरी, ज्वारी आणि करडई या पिकांचा समावेश आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली.
गव्हाच्या किमान आधारभूत दरात प्रती क्विंटल ५० रुपये, मसूर ३०० रुपये, मोहरी २२५ रुपये, हरभरा २२५, ज्वारी ७५, तर करडईच्या किमान आधारभूत दरात ११२ रुपयांनी वाढ केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने या वाढीला मान्यता दिल्याचं तोमर यांनी सांगितलं. संसदेत मंजूर झालेल्या कृषी सुधारणा विधेयकांचा, किमान आधारभूत दर कायद्यातील तरतुदींवर कोणताही परिणाम होणार नाही, असा पुनरुच्चार तोमर यांनी यावेळी केला.
सरकारने गेल्या सहा वर्षात किमान आधारभूत दरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ७ लाख कोटी रुपये वितरीत केले असून ही रक्कम २००९ ते २०१४ या काळात वितरीत केलेल्या रकमेच्या जवळपास दुप्पट आहे, असं तोमर यांनी सांगितलं.
