कोव्हीशिल्ड लस घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश देण्यास युरोपातल्या आणखी काही देशांनी दिली मान्यता
युरोपीय समुदायातल्या आतापर्यंत १५ देशांनी कोव्हीशिल्ड लस घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश देण्यास मान्यता दिली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेतल्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी काल ट्विटरवरून दिली. कोव्हीशिल्ड ही लस अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांनी विकसीत केली असून पुण्यातल्या सीरम संस्थेनं लशीचं उत्पादन केलं आहे.
काल बेल्जियमने या लशीची मात्रा घेतलेल्या प्रवाशांना देशात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. स्वित्झर्लंड आणि आईसलँड या देशांनीही अशी परवानगी दिली आहे. भारत सरकारने परवानगी दिलेल्या प्रत्येक लशीला मान्यता असल्याचं इस्टोनिया या देशानं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे.
