मुंबई : पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही, पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल होऊन संभ्रम निर्माण होत आहे.कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी असे आवाहन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
