कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे-आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं, असं आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, जर खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा. हात धुतल्याशिवाय डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये.
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. साबण लावून पाण्याने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरने हात वारंवार स्वच्छ करावे. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावे. वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा.
सरकारनं २४ तास उपलब्ध असलेला १०४ हा दूरध्वनी मदत क्रमांक सुरु केला आहे. तसेच २०२–२६२–०३७५, या क्रमांकावर संपर्क करता येईल.
मुंबई महानगर पालिकेनं १९१६ हा मदत क्रमांक सुरु केला आहे. तसंच ncov2019@gmail.com या इ-मेल आयडीवर संपर्क साधता येईल.
