“मला कोरोना पूर्वीच होऊन गेला आहे का?” डॉ. चंद्रशेखर साठ्ये लिखित हा माहितीपूर्ण लेख जरूर वाचा
कोरोनाविषाणूची बाधा झालेल्या ८० टक्क्यांहून अधिक लोकांना काहीच त्रास जाणवत नाही, किंवा त्यांच्यामध्ये फार सौम्य लक्षणे आढळून (उदा थोडीशी अंगदुखी वा कणकण) येतात. सहसा अशा व्यक्तींच्या कोरोना – चाचण्या (RT PCR) केल्या जात नाहीत. पण अशा व्यक्ती – ज्यांना एकदा कोरोना होऊन गेलेला आहे, त्यांना कोरोना पुन्हा होण्याची शक्यता फार कमी – नगण्य असते. तसेच अशा व्यक्तींपासून दुस-या व्यक्तींना कोरोना होण्याची – अशी व्यक्ती कोरोनाचा प्रसार करण्याची शक्यताही जवळजवळ शून्य असते. अशा व्यक्तीला पूर्वी कोरोना होऊन गेला आहे का हे कसे ओळखावे? यासंबंधीच्या काही रक्तचाचण्या सध्या उपलब्ध झाल्या आहेत – त्यांना अँटीबॉडी चाचण्या म्हणतात, त्याविषयी आज आपण माहिती करून घेऊ या.
एखाद्या व्यक्तीला एखाद्या जंतूचा (उदा कोरोना विषाणूचा) संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती त्या जंतूला नष्ट करायचा, शरीरातून बाहेर काढायचा प्रयत्न करते. ही एक फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात आपल्या शरीरातील काही लढाऊ पेशी त्या जंतूला पकडून ठार मारतात, तर काही पेशी अशा जंतूच्या विरोधात किंवा त्यांनी निर्माण केलेल्या विषाच्या विरोधात द्रव्ये तयार करून त्यांना (जंतूंना वा जंतुनिर्मित विषद्रव्यांना) निष्प्रभ करतात. या द्रव्यांना अँटीबॉडी म्हणतात. या विशिष्ट रोगप्रतिकारशक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व पेशींची ‘स्मृती’. या पेशी ‘जंतूना’ आणि त्यांच्या विषाला लक्षात ठेवतात आणि त्या जंतुने परत हल्ला केल्यास काही तासातच त्या अँटीबॉडी तयार करून त्या जंतूला गारद करतात.

यात जंतूची शक्ती आणि आपली रोगप्रतिकारशक्ती यांच्यात एकप्रकारचे युद्धच चालू असते म्हणा ना… या युद्धात रोगप्रतिकारशक्तीची सरशी झाली तर माणूस आजारातून बरा होतो, आणि जंतूची सरशी झाली तर माणसास मृत्यू येऊ शकतो किंवा तो रोगजंतू माणसाच्या शरीरात कायमचा राहू शकतो – व काही प्रमाणात त्रास देऊ शकतो. कधी कधी रोगजंतूंना मारण्याच्या जोशात आपली रोगप्रतिकारशक्ती इतकी सुसाट सुटते की तिला आपल्या – परक्याचे भानच रहात नाही. अशी रोगप्रतिकारशक्ती रोगजंतूंसोबत आपल्या पेशींनाही मारू लागते – आणि या कधी कधी घडणा-या रोगप्रतिकारशक्तीच्या या विचित्रपणामुळे आपल्याला फार त्रास होऊ शकतो – व प्रसंगी यामुळे मृत्यूही होऊ शकतो.
वेगवेगळ्या जंतूंकरिता – विषाणूंकरिता आपल्या रोगप्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वेगवेगळा असतो. कोव्हिड १९ हा नवीन आजार असल्यामुळे आपल्या लढाऊ पेशींनी त्याला मारणे हा मुख्य प्रतिसाद आहे, की अँटीबॉडीद्वारे त्याला निष्प्रभ करणे हा प्रमुख प्रतिसाद आहे, की आणखीनच दुसरा काही प्रमुख प्रतिसाद आहे ज्यामुळे कोव्हिड १९ निष्प्रभ करून लोक बरे होताहेत, हे अजून आपल्याला नक्की माहित नाही. पण बहुतांश लोक बरे होताहेत म्हणजे मानवी रोगप्रतिकारशक्ती कोव्हिड १९ विरोधात प्रभावीपणे काम करते आहे एवढे नक्की.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाविषाणूची बाधा झाल्यानंतर त्याला काही दिवसांतच अँटीबॉडी तयार होतात. सुरुवातीला तयार होणा-या अँटीबॉडीज या IgM प्रकारातल्या असतात. त्या काही दिवसांत नाहीशा होतात. सुमारे १४ दिवसांनंतर – तोपर्यंत त्या व्यक्तीचा कोरोना आजार बरा झालेला असतो – त्याच्या शरीरातून कोरोनाविषाणू नष्ट झालेला असतो, तेंव्हा IgG प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात, या मात्र बराच काळ टिकतात. यादेखील काही काळानंतर कमी – कमी होत जातात, पण अशा व्यक्तीला, ज्याला पूर्वी कोरोना होऊन गेला आहे, त्याला कोरोनाविषाणूशी परत संपर्क आला तर त्याची रोगप्रतिकारक पेशींची स्मृती परत जागृत होते आणि त्या मोठ्या प्रमाणात IgG प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतात व अशा व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊ देत नाहीत – किंवा झाली तरी गंभीर आजार होत नाही. या अँटीबॉडीज कोरोनाविषाणूची बाधा होऊन बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तात मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळेच अशा व्यक्तीच्या रक्तातील अँटीबॉडीयुक्त भाग – प्लाझ्मा – हा कोरोनाग्रस्त गंभीर आजारी रुग्णास उपचारार्थ – प्लाझ्मा थेरपी – वापरला जातो – याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडीज रक्तचाचणीद्वारे तपासता येतात – त्यांचे प्रमाण मोजता येते. अशा कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडीज एखाद्याच्या रक्तात सापडल्या तर त्याला पूर्वी कधीतरी कोव्हिड १९ विषाणूची बाधा होऊन गेली आहे, त्यातून तो बरा झाला आहे आणि आता नजीकच्या भविष्यात त्याला कोरोनाविषाणूसंपर्क आला तरी त्यामुळे गंभीर आजार होणार नाही, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. अशी व्यक्ती सर्वसाधारणपणे दुस-या व्यक्तीला कोरोना विषाणू संक्रमित करणार नाही.
आता कोव्हिड १९ हा तुलनेने नवीन आजार असल्याने
१. कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडीज या प्रत्येक व्यक्तीला १०० टक्के कोव्हिड १९ आजारापासून संरक्षण देतात की नाही.
२. कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडीजचे रक्तातील संरक्षणदर्शक प्रमाण किती असावे.
३. कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडीज किती काळ कोव्हिड १९ आजारापासून संरक्षण देतील
याबाबत अजून निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.
मानवजातीला कोरोनाविषाणू काही नवीन नाहीत. सर्दी पडशासारखे आजार कोरोनाविषाणूंपासून होतात. या पूर्वीच्या कोरोनाविषाणूंचा – त्याच्याविरोधातील अँटीबॉडीज विषयक अभ्यासांचा विचार करता – असे म्हणता येईल की हे संरक्षण साधारणतः ६ महिने ते दीड वर्षे राहील. अर्थात यावर अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
एखाद्या व्यक्तीला पूर्वी कोरोना होऊन गेला आहे (एखाद्या व्यक्तीचा पूर्वी RT PCR चाचणीकरिता घशातून घेतलेल्या नमुना द्रव्याचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आलेला आहे), अशा व्यक्तीची कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडी चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो का?
होय. क्वचित प्रसंगी अशा व्यक्तीचा कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडी चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. याकरिता विविध कारणे आहेत.
१. अशी अँटीबॉडी चाचणी नुकताच कोरोना झालेल्या व्यक्तीत केली असता रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो कारण रक्तात पुरेशा IgG अँटीबॉडी तयार होण्यास साधारण २ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागतो.
२. काही व्यक्तींमध्ये कोरोना झाला तरीही रक्तात पुरेशा IgG अँटीबॉडी तयार होत नाहीत – यातील ब-याच व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती अँटीबॉडी तयार करण्यात कमी पडते.
३. कोरोना होऊन गेल्यानंतर ब-याच काळानंतर (३ ते ६ महिन्यांनंतर) अँटीबॉडी चाचणी केली असता ती निगेटिव्ह रिपोर्ट येण्याची शक्यता वाढते – यावेळी IgG अँटीबॉडीचे प्रमाण चाचणीने हुडकून काढू शकण्याच्या प्रमाणापेक्षा कमी झालेले असते.
एखाद्या व्यक्तीला पूर्वी कधीच कोरोना झालेला नाही, अशा व्यक्तीचा कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडी चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो का?
होय. अशा व्यक्तीला पूर्वी कोव्हिड १९ सदृश इतर कोरोनाविषाणूची बाधा होऊन गेलेली असेल तर अशा व्यक्तीचा कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडी चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो.

कोरोनाविषाणूविषयक चाचण्यांसंदर्भात ICMR – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दि. २३ जून २०२० रोजी एक सल्ला-पत्रक काढले आहे. त्यानुसार त्यांनी भारतात कोव्हिड १९ विरोधी IgG अँटीबॉडीज चाचण्या करण्यास अधिकाधिक उत्तेजन देण्याचा सल्ला दिला आहे. या चाचण्या एखाद्या लोकसंख्यासमूहातील किती लोकांना आतापर्यंत कोरोना होऊन गेला याची माहिती देतील – जेणेकरून कोरोनाविरोधी उपाययोजना करण्यासाठी – एखाद्या उपायाची उपयुक्तता तपासण्यासाठी – शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होईल. या सल्लापत्रकात असेही म्हटले आहे, की ही चाचणी सर्वांना करून घेण्यास उत्तेजन द्यावे – जेणेकरून – ज्याचा या चाचणीचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आलेला आहे, ते कोरोनाभयापासून मुक्त होऊन निर्भयतेने काम करू शकतील – आयुष्य जगू शकतील.
ही चाचणी – एका संशोधनाचा भाग म्हणून अलिबागमध्ये आम्ही अल्पखर्चात करत आहोत. ज्यांना ही चाचणी करून घेण्याची इच्छा असेल, त्यांनी डॉ. दीपक गोसावी (८६६९१६२१७४) यांच्याशी संपर्क साधावा.
डॉ. चंद्रशेखर साठये
(shekhar1971@gmail.com)

(लेखक रायगड जिल्ह्यातील अलिबागस्थित अस्थीशल्य विशारद असून सध्या ते स्वतः कोविड-१९ वॉर्ड साठी जिल्हा शासकीय रुग्णालयास स्वेच्छेने सेवा देत आहेत)
