कोरोना संकटातील लॉकडाऊन काळातही नवी मुंबईतील शाळेकडून फीसाठी तगादा; शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालण्याची होतेय मागणी
नवी मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात व राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा सोडल्यास जवळपास सर्व आस्थापन किंबहुना शाळा व कॉलेजही बंद आहेत. अशाच एका कोरोना सुट्टीनिमित्त बंद असलेल्या नवी मुंबईतील, कोपरखैरणे येथील नामांकित शाळा असलेल्या जवाहर एज्युकेशन ट्रस्ट च्या ‘नॉर्थ पॉईंट स्कूल’ ने पहिली ते दहावी इयत्तेतल्या मुलांच्या पालकांना एप्रिल महिन्याची फी रुपये दहा हजार भरायचे फर्मान काढले आहे. शिवाय ही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव फी आहे हे विशेष. सध्या शाळा बरेच दिवसंपासून बंद( सुरू असलेले Online वर्ग म्हणजे फक्त तोंडदाखला दंडवत आहेत) आहे तरीही फी भरण्याचे पत्रक त्यांनी काढल्यामुळे पालकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. या शाळेत आयसीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जातो. पैसे भरण्यास संदर्भातील मेसेज मिळाल्यानंतर पालकांत एकच संतापाची लाट उसळली. अनेक पालकांचे म्हणणे आहे की आधीच लॉकडाऊनमुळे आमचं अर्थचक्र पूर्णपणे बिघडलंय शिवाय त्यातही बहुतेकांना पगार मिळणार नाहीये अथवा अर्धाच येणार आहे. व्यापाऱ्यांना ही व्यापार बंद असल्या कारणाने फार मोठ्या तोट्याचा सामना करावा लागतोय या काळात तरी शाळा चालकांनी माणुसकीचे दर्शन दाखवणे गरजेचे असल्याची भावनाही अनेक त्रस्त पालकांनी व्यक्त केली. मुळात जवळपास महिनाभर शाळा बंद आहेत आणि हा वाढीव लॉकडाऊन ग्राह्य धरला तर दीड महिन्यांच्यावर शाळा बंद राहतील.
या संदर्भात आम्ही शाळेच्या मुख्याध्यापिकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल क्रमांक मिळू न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही. याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीने लक्ष घालावे अशी त्रस्त पालकांची अपेक्षा आहे. या शाळेबाबत अशा अनेक तक्रारी आहेत. तसेच पिळवणूक करणाऱ्या अशा संस्थाचालकांना कुठेतरी लगाम घालाणेही तितकेच गरजेचे आहे. या कठीण काळात आपल्यातली संवेदनशीलता जागृत ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शिक्षण संस्थाचालकांनीही याचे भान जपावे हीच आमची त्यांच्याकडून माफक अपेक्षा.

