‘छोटा पाकिस्तान’ असा उल्लेख केल्याप्रकरणी वंचित आघाडीच्या माजी उपमहापौरावर गुन्हा दाखल
सोलापूर: येत्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नंतर सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष ठीक-ठिकाणी जात आपल्या प्रचार सभा घेत आहेत. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ते सोलापूर दौऱ्यावर होते.
सोलापूर येथे झालेल्या एका प्रचारसभेत आंबेडकर यांच्यासमोर त्यांच्या समर्थकाची जीभ घसरली. सोलापूर येथील नई जिंदगी हा परिसर मुस्लिम बहुल भाग आहे. आंबेडकर यांचे समर्थक माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी भर सभेत त्या परिसराला छोटा पाकिस्तान असे संबोधले. गायकवाड जेव्हा भाषण करत होते. तेव्हा मंचावर प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. एवढेच नाही तर कॉँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांबद्दलही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना गायकवाड यांनी टकले म्हणून संबोधले आहे. सुशीलकुमार शिंदे हे प्रकाश आंबेडकरांचे प्रतिस्पर्धी आहेत.
प्रमोद गायकवाड यांनी बोलताना छोटा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानंतर सभेसाठी आलेल्या लोकांनीही मोठा जल्लोष केला होता. दरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सोलापूरचे माजी उपमहपौर प्रमोद गायकवाड यांच्यासह सभेसाठी आयोजक म्हणून परवानगी घेतलेले श्रीशैल गायकवाड यांनी अटी व शर्थीचा भंग केल्याप्रकरणी यांच्यावरही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
