थेट विक्रीसंदर्भातील ग्राहक संरक्षण नियम २०२१ बाबत अधिसूचना निर्गमित
थेट विक्रीसंदर्भातील ग्राहक संरक्षण नियम २०२१ बाबत केद्र सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. सर्व प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री आणि सेवांसाठी, थेट विक्री होणारे सर्व अनुबंध, भारतातील ग्राहकांना थेट विक्री करणाऱ्या संस्था आणि सर्व प्रकारच्या अनुचित व्यापार पध्दतींना ही नियमावली लागू असणार आहे. तसंच भारताबाहेर उत्पादित होणाऱ्या परंतू भारतात विक्री होणाऱ्या वस्तू आणि सेवांसाठी ही नियमावली लागू असेल.
ही नियमावली जारी झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत विद्यमान थेट विक्री संस्थांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑनलाईन व्यापार, विक्रीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वापरणारे थेट विक्रेते तसेच थेट विक्री करणाऱ्या संस्थांनी ग्राहक संरक्षण नियम, २०२० चं पालन करणं गरजेचं आहे असं आवाहनही केंद्र सरकारनं केलं आहे.
