‘या’ प्रमुख मागण्यांसाठी कोळी बांधवांचा निषेध मोर्चा
उरण, दि ८(विठ्ठल ममताबादे): काल दिनांक ७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे कोस्टल रोडला विरोध करण्यासाठी तसेच कोळी मच्छिमार बांधवांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी, वरळीकरांना पाठिंबा देण्यासाठी रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी येथून सर्व कोळी बांधव जमा झाले होते. आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आणि पारंपरिक मच्छिमार बचाव कृती समिती, श्री हनुमान कोळीवाडा मच्छिमार सोसायटी च्या वतीने वरळी कोळीवाडा येथे प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. मुंबई आमच्या कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची ! समाज बांधवांनो खुप अन्याय होऊ लागलेला आहे आपल्या समाजावर आणि सर्वच बाजूने मग तो कुठलाही असो परंतु आपली कोकण किनारपट्टी पूर्णपणे हद्दपार होत चालली आहे. शासनाने मोठमोठया प्रकल्पांना शेतकरी बांधवाच्या जागा कवडीमोल भावात विकून प्रकल्प ऊभे केलेत आणि प्रकल्पग्रस्त लोकांना नोकरी आणि प्रशिक्षण न देता सरळ परप्रांतियाची भरती करणे चालू आहे.

शेतकऱ्यांच्या जागा घेऊन आज शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. आता मात्र शासनाकडे रिलायन्स, सिडको, एमएमआरडीए, ओएनजीसी, नैना प्रकल्प अशा अनेक कंपन्यांना जागा देण्यासाठी जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. म्हणून शासन समुद्रात भराव करुन जागा तयार करत असून मच्छिमार क्षेत्र पूर्णपणे नष्ट करत आहेत. समुद्र किनाऱ्यावरचे सर्व कोळीवाडे उध्वस्त करुन मोठ्या प्रकल्पांना कोळीड्याच्या जागा देणे चालू आहे. या सार्याला स्थानिक राजकीय पुढारी जबाबदार आहेत. ह्यामुळे सर्वांत मोठा लोकशाहीचा घात होत आहे. अशा वरळी गावातील ग्रामस्थ शरद वासूदेव कोळी, सागर वरळीकर, प्रणालीताई कोळी, मनालीताई वरळीकर यांनी प्रतिक्रिया दिल्या. यावेळी मंगेश कोळी, नरेश कोळी आदी उरण तालुक्यातील अनेक मच्छिमार, कोळी बांधव ही उपस्थित होते.
ग्रामस्थांंच्या प्रमुख मागण्या:
- भविष्यात मासेमारी टिकून राहण्यासाठी वरळी कोळीवाड्यातील किव्हलँड बंदर येथील जाण्या येण्यासाठी स्पँन २०० मिटर अंतर मिळावे
- प्रकल्पग्रस्त म्हणून सर्व मच्छिमार बंधु-भगिनिंना कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी
- मच्छिमार बांधवांच्या जाळ्यांची नुकसान भरपाई मिळावी
- मासेमारी क्षेत्र भरावामुळे बाधित झाले आहे त्याबद्दल कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी
शासनाने या मागण्या पूर्ण केल्या तरच समुद्रात कोस्टल रोड कामकाज चालू करावे अन्यथा काम बंद करण्याचा इशारा शासनाला स्थानिक मच्छिमार, कोळी बांधव व विविध सामाजिक संस्थांनी दिला आहे.
