वाढत्या रुग्णासंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह ७ राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
नवी दिल्ली, दि.२३: कोविड रुग्णांचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, गुजरात, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा यामध्ये समावेश होता. देशातील कोविडच्या एकूण रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण या राज्यांमध्ये आहेत. या चर्चेत आयसीयु खाटांची संख्या तसंच कोविड उपचारांसाठीच्या अन्य सुविधा वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी विशेष भर दिला.
तसंच चाचण्यांची संख्या वाढवावी आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची सुरळितपणे वाहतूक होणं आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन तसंच उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल हेही या बैठकीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी आज सकाळी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला.
ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या देशातल्या प्रमुख उत्पादकांशीही मोदी आज चर्चा करणार आहेत. वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धतेचा ते यावेळी आढावा घेणार आहेत.
