“केंद्र सरकार तपास यंत्रणांचा राजकीय हेतूनं वापर करत आहे” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप
मुंबई, दि.१५: मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते.
या आरक्षणासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, सरकारने वकिलांची फौज तयार ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले. जगात कोरोनाची दुसरी लाट आली असताना राज्यातला धोकाही अजून टळलेला नाही. म्हणून अधिवेशन दोन दिवसांचं ठेवलं आहे, असंही ते म्हणाले.
मेट्रो कारशेड वरून केंद्र सरकार जागेचा वाद विनाकारण उकरून काढत आहे. बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसताना देखील राज्य सरकारनं विरोध न करता जमीन अधिग्रहण करू दिलं त्याच प्रमाणे केंद्रानं देखील आता सहयोग करावा, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.
केंद्र सरकार तपास यंत्रणांचा राजकीय हेतूनं वापर करत आहेत. असा आरोपही त्यांनी केला. प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद केली असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
