दिवाळी च्या मुहूर्तावर महागृहनिर्माण योजना मुख्यमंत्र्यांकडून जाहीर
नवी मुंबई, दि. २४: सिडकोनं दिवाळीच्या मुहूर्तावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या नागरिकांकरता ७ हजार ८४९ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत उलवे नोडमधलं बामणडोंगरी, खारकोपर पूर्व २ ए, खारकोपर पूर्व २ बी आणि खारकोपर पूर्व पी ३ या परिसरात ही घरं उपलबंध करून दिली जाणार आहेत यासाठीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया येत्या २५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होईल. लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम (https://lottery.cidcoindia.com) या संकेतस्थळावर इच्छुकांना आपल्या अर्जाची नोंदणी आणि शुल्क भरता येईल. या योजनेसाठी पुढच्या वर्षी १९ जानेवारी २०२३ रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
