चैत्री एकादशी निमित्त पंढरपूरात विठूनामाचा गजर, मंदिराला रंगीबिरंगी फुलांची माळ
पंढरपूर : आज चैत्र एकादशी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.
चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर व दर्शन रांग भाविकांनी फुलून गेली आहे. चैत्री एकदाशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अवघे पंढरपूर विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेले आहे.
चैत्री एकादशी निमित्त सर्व भाविक प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि नंतर विठ्ठल रुखुमाईचे दर्शन घेतात. चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर , मठ, मंदिर येथे भाविक भजन, कीर्तन व प्रवचनात दंग झाले आहेत. मंदिर प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्यात आल्या असून चोख पोलिस बंदोबस्त व ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने यात्रा सुरळीतपणे पार पाडली जात आहे.
चैत्री एकादशीसाठी पंढरपुरात जवळपास पाच लाख भाविक दाखल झाले आहेत.
