Mumbai_Suburban_Railway-Web
रोज ‘मरे’ त्याला कोण रडे…
कसारा मार्गावर रोजच काही ना काही कारणाने लोकल गाडय़ा उशिराने धावत असतात. कधी सिग्नल बंद तर कधी रेल्वे रुळाला तडा तर कधी जम्बो ब्लॉक अशा घटनामुळे कसारा भागात राहणारे नागरिक त्रस्त असतात. आज सकळी पावणेअकराच्या सुमारास वासिंद ते आटगावदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.
खडवली, वशिंद, आसनगाव या स्थानकादरम्यान
लोकल व मेल-एक्प्रेस गाडय़ा रखडल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
आज सकाळी वासिंद ते आटगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेडचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला आणि काही क्षणातच या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. विशेषतः वासिंद, टिटवाळा, आटगाव, खर्डी, कसारा, आसनगाव, इगतपुरी येथे अनेक लोकल गाडय़ा आणि मेल, एक्प्रेस गाडय़ा उभ्या होत्या.
कसाऱ्या वरून मुंबईला जाणारी १० वाजून ५२ मिनिटांची लोकलदेखील आसनगाव स्थानकावर थांबलेली होती. तर ११.१६ ची आसनगाव येथून मुंबईला जाणारी लोकल रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे आसनगाव स्थानकाजवळ वाराणसी एक्प्रेस, आटगाव लुपलाइनवर जनशताब्दी एक्सप्रेस, खर्डी स्थानकात मुंबईकडे जाणारी लोकल बंद पडली. तर कसारा-इगतपुरीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ाही तशाच उभ्या होत्या. दुपारी १२.३० च्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र दोन तास प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.
