‘सीबीआय’ची महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये विविध ठिकाणी छापेमारी
युको बँकेच्या अनेक खात्यांमधे IMPS द्वारे सुमारे ८२० कोटी रूपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याप्रकरणी सीबीआयनं आज महाराष्ट्र आणि राजस्थानातल्या ६७ ठिकाणी छापे मारले. याप्रकरणी युको बँकेनं तक्रार केल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमधे सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता.
१० ते १३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सात खाजगी बँकांतल्या १४ हजार ६०० खात्यांमधून चुकून युको बँकेच्या ४१ हजार खात्यांमधे ८२० कोटी रूपये भरले गेले. मूळ बँकांमधून प्रत्यक्षात पैसे हस्तांतरीत न होताच हे पैसे युको बँकेच्या खात्यात जमा झाले. त्याचा गैरफायदा घेत अनेक खातेधारकांनी विविध बँक सेवांच्या माध्यमातून पैसे काढून घेतले. या प्रकरणात गेल्या वर्षी डिसेंबरमधे सीबीआयनं कोलकाता आणि मंगलोर इथं १३ ठिकाणी छापे घातले होते.
