“तांत्रिक वस्त्रोद्योगसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये स्टार्ट अप्स आणि युवा वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे” – केंद्रीय मंत्री पियुष गोयल
तांत्रिक वस्त्रोद्योगसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये स्टार्ट अप्स आणि युवा वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले . नवी दिल्ली येथे काल वस्त्रोद्योग संशोधन संघटनेच्या (टीआरए) आढावा बैठकीत ते बोलत होते. पियुष गोयल यांनी वस्त्रोद्योग संशोधन संघटनांना जागतिक दर्जाच्या मजबूत अत्याधुनिक प्रयोगशाळा, आधुनिक यंत्रसामग्री यासह कोणत्याही बाबतीत सरकारकडून काही सहकार्य हवे असल्यास तसे प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, भारतीय मानक संस्था टीआरएच्या प्रयोगशाळा आधुनिक करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य देऊ शकेल. नाविन्यपूर्ण संशोधन आणि विज्ञान केंद्रित शाश्वत विकासाला चालना देण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने टीआरएमध्ये शास्ज्ञज्ञांची संख्या वाढवण्यासाठी विशेष निधी तयार करण्याचेही गोयल यांनी सुचवले.

अखेरच्या मैलापर्यंत यश गाठण्यासाठी प्रकल्पांचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि त्यानुसार प्रकल्प व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी प्रकल्पांना मंजुरी देता येईल. वैद्यकीय वस्त्रोद्योगासाठी, क्लिनिकल चाचण्यांशिवाय संशोधन अपुरे राहील, असेही त्यांनी नमूद केले. म्हणून, तांत्रिक वस्त्रोद्योगातील पुढील प्रकल्प मंजूर करताना क्लिनिकल चाचण्यांचा खर्चही विचारात घेतला पाहिजे. त्यांनी सरकारशी संबंधित संस्थांनी सादर केलेल्या पेटंटच्या अर्जांना गतिमान पद्धतीने मंजुरी देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
