“लोकल प्रवासासाठीचे अॅप दोन दिवसांत तयार केले जाईल” – मुंबई मनपा आयुक्त
मुंबई, दि.१०: कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांना येत्या १५ तारखेपासून लोकल प्रवास करण्याची मुभा राज्यसरकारनं दिली आहे. अशा प्रवाशांसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेनं घेतली असून येत्या दोन दिवसात यासाठी अॅप तयार केला जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.
लोकल प्रवासाविषयी निर्णय घेताना रेल्वे प्रशासनाबरोबर चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण चर्चेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिल्यानंतर लोकल प्रवासाविषयी निर्णय घेतला गेला असंही चहल यांनी स्पष्ट केलं, लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना पास देण्यासंदर्भात तसंच क्यू आर कोड देण्यासंदर्भात यंत्रणा उभारली जात असून ऑफलाईन पद्धतीनंही प्रवाशांना पास दिला जाणार आहे. यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि फोटोची आवश्यकता असेल असंही चहल यांनी सांगितलं.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचं आपण स्वागत करतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांचा क्यू आर कोड तपासण्याची जबाबदारी घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
