आगरी कोळी कराडी समाजाचे अस्मिता, अस्तित्व टिकविण्यावर परिषदेचा भर
उरण, दि.६(विठ्ठल ममताबादे): नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच भूमिपुत्र-सागरपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या यावर विचारविनिमय करण्यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड येथील सामाजिक संस्थांची संयुक्त बैठक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, तेलीपाडा, उरण येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बेरोजगार प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र, सागरपुत्र तसेच आगरी, व कोळी कराडी समाजाच्या न्याय हक्कासाठी भविष्यात जन आंदोलन उभारण्याचा व विविध समस्यांवर प्रभाविपणे काम करण्याचा ठाम निर्णय विविध संस्था, संघटनेच्या परिषदेमध्ये घेण्यात आले.
नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईसह चार जिल्हयातील आगरी, कोळी आणि इतर भूमिपुत्र समाज संघटित झालेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी शासनाकडे आग्रह धरण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे गावठाण विस्तार, गरजेपोटी बांघलेली घरे नियमित करणे, घरांना प्रॉपर्टी कार्ड निर्गमित करणे, घरांची जागा घरमालकांच्या नावे करणे, मच्छिमारांचे विविध प्रश्न, नवी मुंबई विमानतळ बाधितांचे योग्य पुनर्वसन आणि इतर मागण्या, प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण आणि रोजगार, नैना प्रकल्पबाधितांचे प्रश्न, विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क आदि प्रश्न मागील ५० वर्षांपासून प्रलंबित आहेत.
मुंबई लगतच्या तिन्ही जिल्ह्यातील सागरकिनारी आगरी व कराडी समाज भातशेतीवर तर कोळी समाज मच्छीमारीवर अवलंबून आहे. परंतु या समाजाचे पारंपारिक व्यवसाय विविध प्रकल्पांमुळे धोक्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात या समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विकासाच्या नावाखाली येथील भूमिपुत्रच परागंदा होत आहे त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या संयुक्त परिषदेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी ऍड. सुरेश ठाकूर, JNPT चे विश्वस्त भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते-निलेश पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, अजित पाटील, सरचिटणीस संतोष पवार, सीमा घरत, प्रा. राजेंद्र मढवी यांच्यासह ५५ हुन अधिक विविध सामाजिक संस्था, संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
