मुंबई, दि. २७: कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून राज्यात साजरा केला जातो. या निमित्ताने राज्यभर सरकार तर्फे तसेच विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” या कार्यक्रमाचे आयोजन आज रोजी दुपारी मध्यवर्ती सभागृह, विधानभवन, मुंबई येथे करण्यात आले होते.
‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’ आज राज्यात विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित साहित्याची ज्ञानयात्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचना यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे, विधानसभेचे अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
मराठी राजभाषा दिना निमित्त, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर इथल्या संदर्भ विभागात मराठी भाषेच्या विविध बोली भाषा, लिपी, ग्रंथ आणि लेखांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आलं. साहित्यिक रंगनाथ पठारे, जयप्रकाश सावंत, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मुनघाटे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थितीत होते. हे प्रदर्शन २८ फेब्रुवारी ते ४मार्च या काळात सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत खुलं राहील. नाशिकचं विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांनी ग्रंथ दिंडीचं आयोजन केलं होतं. ग्रंथदिंडीच्या अग्रभागी मनपाचा चित्ररथ होता. सुमारे ६०० विद्यार्थी त्यात सहभागी झाले. लेझीम, ढोल वाद, झेंडा, झांज पथक, संबळ पथक आणि विद्यार्थ्यांच्या लाठी-काठीच्या प्रत्यक्षिकांनी लक्ष वेधलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं इथं बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीनं मराठी राजभाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला. यावेळी मराठी सुलेखनकार सुमित दाभोलकर यांनी कॅलिग्राफी द्वारे रेखाटलेले मराठी गौरव गीत प्रदर्शनार्थ ठेवलं होतं. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले.