‘बेस्ट’मध्ये आवश्यकतेनुसार पदभरती करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. ४: ‘बेस्ट’मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सध्याचा पदांचा आढावा घेऊन विभागात पदांची आवश्यकता लक्षात घेऊन पदभरती केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये प्रवाशांना अविरत परिवहन सेवा आणि अखंडित वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट मधे अधिकारी आणि कर्मचारी यांची पदभरती करावी, असा प्रश्न नियम ९२ अन्वये सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता लक्षात घेऊन पदभरती करण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. निवृत्तीवेतनाबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून यामध्ये विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड आणि सुनील शिंदे यांना सहभागी करुन घेतले जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुनील शिंदे यांनी या सहभाग घेतला.
