महाराष्ट्रातील चंद्रपूरचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन
चंद्रपुर, दि. ३०: महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे नवी दिल्ली इथं रुग्णालयात निधन झालं. ते ४८ वर्षांचे होते. दोन तीन दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या विकारानं प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना दिल्ली इथं रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे त्यांचे उपचारादरम्यान निधन झालं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात म्हणून विजय मिळवला. बाळू धानोरकर यांचं पार्थिव दिल्ली इथून नागपूरमार्गे वरोरा इथं दुपारी दीड वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे, त्यानंतर उद्या वणी – वरोरा मार्गावरील मोक्षधाम इथं सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही धानोरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन, श्रद्धांजली वाहिली आहे. धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारा एक समर्पित नेता आणि बंधुतुल्य सहकारी गमावला, अशा शोकभावना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
Source – AIR
