ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिन अनोखी शब्दांजली वाहिली आहे
बाळासाहेब: एक लेणे!
दिवाळी नुकतीच सरलेली आणि नको नकोशी वाटणारी ती बातमी कानावर येऊन आदळलीच. ‘बाळासाहेब गेले!’ दोन शब्दांचा तो निरोप विजेच्या गतीने देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आणि दिवाळीतच मिणमिणते होत राहिलेले दिवे पार विझूनच गेले. केवळ मराठी मनावर नव्हे, तर अखंड भारतावर जणु काजळी पसरली. सर्वत्र अंध:काराचे साम्राज्य स्थापन झाले, असे वाटू लागले. जग होत्याचे नव्हते झाले.
रात्र होईपर्यंत वांद्र्यातील त्यांच्या निवासस्थानासमोर हजारोंची गर्दी झाली. उद्याचा सूर्य उगवूच नये, असेच साऱ्यांना वाटत होते. पण सृष्टीच्या नियमानुसार दिवस उजाडला आणि सकाळीच बाळासाहेबांची अंतीम यात्रा सुरू झाली.
अशी अंत्ययात्रा उभ्या जगाने क्वचितच अनुभवली असेल. एकाच वेळी १७ लाख लोक त्या एका महामानवाचे अखेरचे दर्शन डोळ्यात साठवण्यासाठी धडपडत होते. ही महायात्रा बाळासाहेबांच्या लाडक्या शिवतीर्थावर पोहोचली, तेव्हा सूर्यसुद्धा क्षीतीजाच्या आडोशाला जाऊ पाहात होता.
अखेर दिवेलागण होता होता ज्या पवित्र भूमीवर ४६ वर्षांपूर्वी प्रबोधनकार ठाकरेंनी आपला ‘बाळ महाराष्ट्राच्या सेवेत जाहीरपणे रुजू केला, त्याचे पार्थिव पचंमहाभूतांच्या स्वाधीन झाले.
सरणाच्या ज्वाळा धडधडत आकाशाला भिडू लागल्या. ‘परत या, परत या, बाळासाहेब परत या’ हा लाखो चाहत्यांचा आक्रोश होता. पण त्याला न जुमानता बाळासाहेब निघून गेले होते. एक युगान्त झाला होता.
गेल्या शतकाने चीनमध्ये माओ-त्से’ तुंग, रशियात लेनीन, भारतात महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या प्रचंड अंत्ययात्रा पाहिल्या होत्या. त्याच तोडीचा हा प्रसंग. अंत्ययात्रा वांद्र्यापासून सहा किलोमीटर्सवरील शिवाजी पार्कपर्यंत पोहोचण्यास आठ तास लागले. कारण या प्रत्येक फुटावर बाळासाहेबांच्या पाऊलखुणा त्यांच्या लाखो चाहत्यांना स्पष्ट दिसत होत्या. केवळ एका माणसाची शेहेचाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतली ही कमाई.
शिडशिडीत शरीरयष्टीच्या पावणे सहा फूट उंचीच्या या मध्यमवर्गीय माणसामध्ये अशी काय जादू होती? ते कळण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नजर टाकणे गरजेचे आहे.
१९६०च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १०५ हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागाचे चीज झाले. भारताच्या नकाशावर एका नव्या राज्याचे नाव कोरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजाचे मऱ्हाटी राज्य आणि पेशवाई यांच्या अस्तानंतर प्रथमच मराठी संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्त्व कायदेशीररित्या मान्य झाले. समस्त मराठी सामजाने केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे कट नेस्तनाबूत झाले आणि मुंबई महाराष्ट्राची झाली. महाराष्ट्राचा मंगल कलश मुंबईत आल्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, त्यामुळे मराठी मनाला नवा मोहोर फुलला.
हे सारे झाले खरे, पण त्याची फळे काही मराठी माणसाच्या पदरात पडली नाहीत. मुंबई महाराष्ट्रात आली पण मुंबईतून मराठी माणसालाच हद्दपार करण्याचे कट महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच शिजू लागले. मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी बनली नाही, तर एव्हाना ती देशाची आर्थिक राजधानी झालेली होती. मुंबईच्या गिरण्या, औद्योगिक कारखाने, रासायनिक फॅक्टरीज, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुख्य म्हणजे ऐतिहासिक महत्त्व लाभलेली गोदी यामुळे मुंबईकडे अवघ्या देशाचे लक्ष होते.
त्यामुळेच मुंबई परप्रांतियांचे ‘लक्ष्य’ही बनली. देशाच्या सर्व भागांतून मुंबईकडे रस्ते दुथडी भरून वाहू लागले. त्यात उत्तर हिंदुस्थानी, शेजारच्या राज्यातील गुजराती होतेच, शिवाय मराठी माणसाच्या नोकरीवरच घाला घालणारे दाक्षिणात्य मोठ्या प्रमाणावर मुंबईत घुसू लागले. मुंबईच्या खाजगी नोकऱ्यांबरोबरच सरकारी, निम-सरकारी आस्थापनांमध्येही केवळ दाक्षिणात्यच दिसू लागले. बँकांच्या काऊंटरवर मद्रासी, रेल्वेच्या बुकिंग खिडकीत मद्रासी आणि मंत्रालयाच्या केबिनमध्येही मद्रासीच.
मराठी माणसाने करायचे काय?
सरकारी नोकरी पेशातील दक्षिणी हल्ल्याचे परिणाम मुंबईच्या सामाजिक व सांस्कतिक जगावरही दिसू लागले. माटुंग्याचे माटुंगम् कधी बनले ते कुणाला कळलेच नाही. चेंबूर, कुर्ला, भांडुप सर्वत्र दाक्षिणात्यांचे राज्य आले. घटकोपर, मालाड, बोरिवली ही उपनगरे गुजराती झाली, तर सांताक्रुझ, मुलुंड, ट्राँबे उत्तर भारतीयांचे मोहल्ले बनले. मराठी माणसाच्या मुंबईतून मराठी माणूस दूर, डोंबिवली, विरार, वसई, कल्याणला फेकला जाऊ लागला. त्याला सरकारी, निम-सरकारी नोकरी मिळेना. मराठी माणसाच्या पिछेहाटीबरोबर साहजिकच मराठी भाषेचीही पिछेहाट सुरू झाली. मुंबईत सार्वजनिक व्यवहारातून मराठीचे उच्चाटन होऊ लागले.
हे होईपर्यंत पहिली पाच वर्षे उलटली होती. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या नव्याची नवलाई उतरली होती. ‘मराठी’ राज्य मिळवल्याची झिंग आता मराठी मनातून उतरु लागली होती. मुंबईतला मराठी माणूस आतल्या आत रडत होता, कण्हत होता आणि संतापतही होता. पण हे सारे काही आतल्या आत. रस्त्यावर येऊन पुन्हा आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याची हिंमत त्याच्यात उरली नव्हती आणि ज्यांच्यात तशी हिंमत शिल्लक होती, त्यांना आपल्या सोबतीला कोणी येईल का, याची शाश्वती नव्हती. आतल्या आत धुमसणारे ज्वालामुखी तसेच थंड पडून होते. परप्रातियांचे लोढे मात्र घुसतच होते.
अशा निराशाजनक वातावरणात एक कलावंत आपल्या ब्रशच्या फटकाऱ्याने व्यंगचित्रे काढून भल्या भल्या नेत्यांची भंबेरी उडवत होता. पंडित नेहरूंपासून स. का. पाटलांपर्यंत आणि यशवंतराव चव्हाणांपासून व्ही. के. कृष्ण मेननपर्यंत साऱ्यांना या व्यंगचित्रकाराने सळो की पळे करून सोडले होते. या सडसडीत शरीरयष्टीच्या पण पोलादी काळीज लाभलेल्या कलावंताच्या ऊरात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग अद्याप धगधगत होते. संयुक्त महाराष्ट्र्राचा लढा या कलावंताने आपल्या घरातून अनुभवला होता. अन्यायाविरुद्ध झगडायचे, तर अथक लढा द्यावा लागतो आणि तो देताना सर्वस्वाची होळी करावी लागते, हे त्याने बालपणापासून अनुभवले होते.
मराठी माणसाला आता त्याच्या राज्याच्या राजधानीतच न्याय मिळवून द्यायचा तर त्यासाठी त्याची आणि फक्त त्याचीच चळवळ उभी राहायला हवी. त्याची स्वत:ची, हक्काची संघटना हवी, हे त्याने पक्के जाणले आणि त्याने कामाला सुरूवातही केली. हे सारे कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही राजकीय शक्ती वा व्यक्ती पाठीशी नसताना आणि पैशाची पाकिटेही फाटकीच असताना…
या कलावंताचेच नाव, श्रीमान बाळासाहेब! त्यांनी उभारलेल्या संघटनेचे नाव ‘शिवसेना!’
शिवसेना या चार अक्षरांनी केवळ मुंबई आणि महाराष्ट्रात नव्हे, तर देशात इतिहास निर्माण केला. भारत हे संघराज्य असले आणि राज्य घटनेने सर्व भारतीयांना संचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असला, तरी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या राज्यांच्या सरकारांची आणि तिथल्या स्थानिक समाजाची आहे, हे मूलभूत तत्त्व बाळासाहेबांनीच प्रथम समाजासमोर मांडले.
पुढे याच तत्त्वावर अनेक राज्यांत स्थानिक भूमिपुत्रांच्या चळवळी सुरू झाल्या व अनेक ठिकाणी त्या यशस्वीही झाल्या. त्यांची बिजे बाळासाहेबांनीच रुजवली. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी तामीळनाडूत अण्णा दुराई या कलावंतानेच द्रविड मुन्नेत्र कळघम ही द्राविडी लोकांची चळवळ सुरू करून पुढे सत्ताही ताब्यात घेतली होती. पण अण्णांची चळवळ वंशवादाची होती. बहुसंख्याक द्रविड समाजावर कुरघोडी करून तिथल्या अय्यर, अय्यंगार समाजाने मानाच्या व प्राप्तीच्या सरकारी जागा अडवल्या होत्या. अण्णांचा लढा त्यांच्याविरुद्ध होता. एका अर्थाने ही चळवळ तामिळी विरुद्ध तामिळी अशीच होती.
बाळासाहेबांचा पिंड वेगळा. त्यांनी जात-पात तोडून समस्त मराठी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आणि मराठी विरुद्ध अमराठी असा लढा पुकारला. ती काळाची गरज होती. ती बाळासाहेबांनी वेळीच ओळखली, हे बरे झाले. नाही तर पुढच्या दहा वर्षांतच मुंबईतून मराठी माणूस कायमचा हद्दपार झाला असता आणि काही दिवसांतच मुंबई महाराष्ट्रापासून दुरावली असती.
बाळासाहेबांचे हे कर्तृत्त्व व उपकार मराठी समाजाला केव्हाही विसरता येणार नाहीत. शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांने भर रस्त्यावर एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली, त्यानंतरच बँकांमध्ये ८० टक्के नोकऱ्या मराठी तरुणांना मिळू लागल्या. त्यापाठोपाठ एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, रेल्वे, गोद्या, विमा कंपन्या, सरकारी व निमसरकारी रुग्णालये आदी ठिकाणीही मराठी तरुणांनी मानाने आणि हक्काने प्रवेश मिळवला.
भूमिपुत्रांच्या लढ्याच्या इतिहासातली ही सोनेरी पाने बाळासाहेबांनी लिहिली.
शिवसेनेपासूनच स्फूर्ती घेऊन पुढे आंध्र प्रदेशात एन.टी रामाराव या आणखी एका कलावंताने तेलुगु देसम्ची स्थापना केली आणि तेलुगु अभिमानाचे असे झंझावात उभे राहिले की, पहिल्या फटक्यातच १९८२ साली आंध्रातील काँग्रेसची सत्ता उलथून पडली. आसामात प्रफुल्ल कुमार महंत या विद्यार्थी नेत्याने अशीच कमाल केली. त्यांच्या आसाम गण परिषदेने बंगाल्यांच्या प्रभुत्वाला आव्हान दिले आणि बघता बघता तिथले काँग्रेस सरकार गडगडले. महंत भारतीय इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. कर्नाटकात कर्नाटक क्रांती रंगा, बिहारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, बंगालमध्ये गोरखा लँड मुक्ती संग्राम या आणि अशा चळवळी राज्याराज्यांत सुरू झाल्या, याचे कारण शिवसेनाच.
१९६६ साली निर्माण झालेल्या शिवसेनेने मुंबईतल्या मराठी माणसाला जगण्याची उभारी आणि लढण्याची हिंमत तर दिलीच, शिवाय मुंबईच्या कामगार जगावरची कम्युनिस्टांची लाल पकडही ढिली केली व पुढे तिला हद्दपारच केले. भारताच्या आर्थिक प्रगतीवरील एक मोठे अरिष्ट बाळासाहेबांमुळेच टळले.
बेफाम मागण्या करून गिरण्या, कारखान्यांत संप घडवून आणायचे आणि कामगाराला न्याय मिळवून देतो, असे भासवत उद्योग बंद पाडायचे, हे धंदे करणाऱ्या कम्युनिस्ट नेत्यांना बाळासाहेबांनी देशोधडीला लावले. म्हणूनच मुंबईतले उद्योग टिकले आणि इथल्या कामगारांचे रोजगार वाचले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावरही बाळासाहेबांनी छाप टाकली. तो काळ असा होता की, मुंबईत मराठी चित्रपटांना थिएटर मिळणे कठीणच नव्हे, तर अशक्य बनले होते. मुंबईत काही चित्रपटगृहांत तामीळ, मल्याळी, तेलुगू चित्रपट झळकायचे आणि टिकायचे, पण मराठी चित्रपटांना मात्र थिएटर नाही. बाळासाहेबांनी या विरुद्ध आवाज उठवला. चित्रपट कलावंतांना एकत्र आणले. त्यातून चित्रपट सेनेचा जन्म झाला. मोर्चे निघाले, आंदोलने झाली. काही चित्रपटगृहांच्या काचा फुटल्या, खुर्च्या तुटल्या, पडदे फाटले, फिल्म जळल्या. पण अखेर मराठी चित्रपटांना न्याय व हक्काची थिएटर मिळू लागली.
अर्थात प्रांतिक अस्मिता जागी करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे, हे बाळासाहेबांचे एकमेव इप्सित कार्य नव्हते. त्यांच्या महाराष्ट्रवादाला राष्ट्रवादाचा पाया आणि कणा होता. तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना चेतवणे, बाळासाहेबांचे महत्त्वाचे कार्य. १९७१चे पाकिस्तानविरुद्धचे बांगला देश मुक्ती युद्ध असो किंवा १९९६चे कारगील युद्ध, बाळासाहेबांनी राष्ट्रवादाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांचा राष्ट्रवाद जळजळीत व तेजस्वी होता. त्याची धग अनेकांना मानवणारी नव्हती. त्या आगीत आपण भस्म होऊ, या भीतीनेच अनेकांनी त्यांच्या राष्ट्रवादाला हिंदुवाद वा जातीयवाद अशी नावे ठेवली. बाळासाहेब सतत सांगत राहीले की, मी हिंदुवादी नसून हिंदुत्ववादी आहे आणि या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असणार. त्यांचा विचार तथाकथित बुद्धिमंत व निधर्मवाद्यांना समजायला आणखी काही काळ जावा लागेल, हे नक्की.
इतके मात्र खरे की आजही काश्मिरातील हिंदू पंडित आणि पंजाबातील शिख अभिमानाने आणि कृतज्ञतापूर्वन शब्दांत सांगतात की, बाळासाहेब होते म्हणून आज आम्ही हयात आहोत. बाळासाहेबांना यापेक्षा वेगळ्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही.
(क्रमशः)
– ज्येष्ठ पत्रकार मा. खा. भारतकुमार राऊत
(‘स्मरण’ या स्मृतिचित्र संग्रहातून)
(ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार भारतकुमार राऊत यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार)
