‘हमारा बजाज’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे पुण्यात निधन
पुणे, दि.१२: ज्येष्ठ उद्योगपती व बजाज उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज दुपारी पुण्यात निधन झाले. मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचार घेत होते. परंतू अखेर आज दुपारी एक-एक अवयव निकामी होत गेल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांचे जाण्याने बजाज उद्योगसमूहास मोठा धक्का बसला आहे.
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांनी १९६८ साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए (ऑनर्स) हि पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास केला. याच दरम्यान त्यांनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली होती. राहुल बजाज यांचा विवाह १९६१ साली रुपा घोलप या मराठी मुलीसोबत झाला. राहुल यांच्यामागे राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं आहेत.
