स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ
मुंबई, दि. १८ : स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत आहेत. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे स्वामित्व योजनेंतर्गत सनद वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृह येथून ऑनलाईन उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त व संचालक डॉ.सुहास दिवसे, विभागीय आयुक्त राजेश देशमुख तसेच पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.
देशातील गरीबी कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकाजवळ मालमत्तेचे अधिकार असणे गरजेचे आहे असे सांगून प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, देशातील लाखभर लोकांकडे संपत्ती असूनही त्यास किंमत मिळत नव्हती. स्वत:चे घर असूनही काही लोक त्यावर कब्जा करत होते. २०१४ पासून आम्ही देशातील ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करत आहोत. यामुळे लोकांचे जीवन बदलणार असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले. स्वामित्व योजनेंतर्गत या प्रॉपर्टी कार्डमुळे देशातील भ्रष्टाचार कमी होणार आहे. आज ९८ टक्के भूमी अभिलेखाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. आज गावोगावी शौचालये, उज्ज्वला गॅस, जलपुरवठा, आयुष्यमान, सडके, इंटरनेट, ब्रॉडबँडसोबत कॉमन सर्व्हिस सेंटर या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शहरामध्ये मिळणाऱ्या सुविधा आता गावात मिळत आहे. देशातील गरीब सशक्त झाला तरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
