शासकीय रुग्णालयांनी व्हेंटिलेटर्स संदर्भात संपूर्ण माहिती सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातल्या शासकीय रुग्णालयांनी प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्स संदर्भात संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश खंडपीठानं प्रशासनाला दिले आहेत. कोरोना संदर्भात विविध वृत्तांची दखल घेत न्यायालयानं स्वत:हून दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान हे निर्देश देण्यात आले.
ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर खंडपीठानं २१८ मेट्रीक टन ऑक्सिजन दररोज पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. यावर राज्य शासनाच्या अन्न आणि औषधी विभागाच्या वतीनं शपथपत्र सादर करण्यात आलं.
विभागात तसंच संपूर्ण राज्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असून, त्याअनुषंगानं आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, त्यामुळे रोज ३१८ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठ्याच्या आदेशात सुधारणा करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
खंडपीठानं तशी सुधारणा करण्यास मान्यता दिली. मात्र, ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असंही खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलं.
