काँग्रेस तर्फे ही राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन
मुंबई, दि. ९ : ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात आपल्या जीवावर उदार होऊन लढलेल्या तसेच प्रसंगी बलिदान दिलेल्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलंय भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवा आयाम देणारा संस्मरणीय दिवस म्हणजे ऑगस्ट क्रांतिदिन !
बुलडाणा शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त, सामुदायिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातल्या शाळांमधल्या हजारो विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन, पोलिस बॅण्डसह उत्स्फूर्तपणे राष्ट्रगीत गायन केलं. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या विशेष सेल्फी पाईंटवर नागरिकांनी सेल्फी देखील काढले.
धुळे जिल्ह्यातल्या चिमठाणे इथं काँग्रेसनं आज पदयात्रा आयोजित केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते हातात तिरंगा घेवून पदयात्रेत सहभागी झाले होते. भारत छोडो आंदोलनानिमित्त वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी आणि सामाजिक संघटना तसंच नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भर पावसातही विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात राष्ट्रगीताचं गायन केलं. वर्धा शहरात झालेल्या कार्यक्रमात खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार सहभागी झाले होते.