मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई, दि. ३ : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्याच्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.
तपासात सातत्य रहावं यासाठी विशेष तपास पथकातल्या काही अधिकाऱ्यांची दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती करण्याचे आदेश न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी दिले. आतापर्यंत खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत पानसरे यांच्या नातेवाईकांनी तपास एटीएसकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.
सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सुरू आहे. त्यांनाही या प्रकरणी एटीएसला सहकार्य करण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयाला केल्याचं पानसरे यांच्या सूनबाई मेधा पानसरे यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. २० फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांचा मृत्यू झाला होता.
