राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळली असल्याचा भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई, दि.२३: राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून पोलिसांच्या सहकार्याने सरकारनं उच्छाद मांडला आहे असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ते आज मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर आणि भाजपच्या पोल-खोल सभांवर झालेल्या हल्यांबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या राज्यात तपास अधिकारी, पंच, साक्षीदार कोणीही सुरक्षित राहत नसल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. भाजप लोकशाहीचा सन्मान करणारा पक्ष आहे मात्र वेळ आल्यास ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपची मागणी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे गृहमंत्रालय पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
