आशा कार्यकर्त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार जाहीर
जागतिक आरोग्य क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातल्या सुमारे दहा लाख आशा कार्यकर्त्याना सन्मानित केलं आहे.
डब्ल्यू एच ओ चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी ग्लोबल हेल्थ लीडर्स अर्थात जागतिक आरोग्य नेत्यांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे, त्यात आशा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आशा कार्यकर्त्यांची नेतृत्व क्षमता आणि क्षेत्रीय पातळीवर आरोग्य सेवांशी निगडित कर्तव्य तत्परता या गुणांचा सन्मान डब्ल्यू एच ओ नं केला आहे.
कोविड १९ साथीच्या काळात ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्य व्यवस्थेशी जोडण्यात आणि त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात या महिला कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका आहे. आशा कार्यकर्त्या ग्रामीण भागातल्या मातांची प्रसुतीच्या काळात काळजी घेतात तसच बालकांचं लसीकरण सामुदायिक आरोग्य सेवा पुरवणं, उच्च रक्तदाब, क्षयरोगावर उपचार आणि पोषण, स्वच्छतेबरोबरच निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करतात, असं डब्ल्यू एच ओ नं म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सन्मानाबद्दल आशा कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. आशा कार्यकर्त्या देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्रात आघाडीवर असतात, त्यांची समर्पण वृत्ती आणि निर्धार वाखाणण्याजोगा आहे, असं ट्विट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.
