एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांचा पाय आणखी खोलात
मुंबई, दि. १५: आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत. सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाच्या माजी संचालकाविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गोवण्यात न येण्याच्या बदल्यात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आला आहे.
‘एफआयआर’ मध्ये नमूद केल्यानुसार, समीर वानखेडेच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. समीर वानखेडे यांनी गोसावी याला सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावी याने १८ कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही तर गोसावी याने ५० लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले होते.
तपासात समीर वानखेडे यांनी आपल्या परदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. त्याने त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल योग्य स्पष्टीकरण देखील दिले नाही. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही या एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
