अमेरिका पाकमध्ये घुसून ओसामा लादेनला मारू शकते तर भारतही तसे करू शकतो : अरुण जेटली
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
अमेरिकेचे नेव्ही सील कमांडो पथक पाकिस्तानात घुसून अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनला मारू शकतात, तर काहीही होऊ शकते. भारतही अशा प्रकराची कारवाई करु शकतो, असे पाकिस्तानला उद्देशून अरुण जेटली म्हणाले. याचबरोबर, दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई केली, तर ती योग्यच असते. हे अमेरिकेने दाखवले आणि त्याला जगामध्ये कोणीही विरोध केला नाही, असेही अरुण जेटली यांनी सांगितले.
भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानच्या बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा दहशतवादी प्रशिक्षण तळ बॉम्ब हल्ल्यात उद्धवस्त केला. पण जैशचा म्होरक्या मसूद अझहर अजून जिवंत आहे. जगाने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावा, मात्र वेळ पडल्यास भारत त्याचा लादेन करू शकते, असं जेटली यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.
