अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर
मुंबई, दि. २६ : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार ६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
पहिल्या दिवशी तीन विधेयके सादर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४ मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४ आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक २०२४ मांडले.
कृषीपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी वीजबिलासाठीच्या अनुदानासाठी पावणे चौदाशे कोटी रुपयांहून अधिक तरतूद प्रस्तावित आहे. डिसेंबरमध्ये सरकारनं ५५ हजार ५२० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय देण्याची मागणी विधानसभेत केली. सरकार याप्रकरणी गंभीर आणि सकारात्मक आहे. मात्र आताच सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात असा आग्रह चुकीचा असून थोडी लवचिक भूमिका स्वीकारली तर मार्ग निघेल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं.
दोन्ही सभागृहात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि विद्यमान सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव शोक प्रस्ताव संमत झाला. या मान्यवरांना आदरांजली अर्पण करुन दोन्ही सभागृहांचं आजचं कामकाज संपलं. कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ओबीसी आणि मराठा आरक्षणप्रश्नी विरोधकांनी आंदोलन केलं.
