साथ रोग दुरुस्ती विधेयकाला मंजूरी
राज्यसभेत गेल्या आठवड्यात मंजूर झालेल्या साथ रोग दुरुस्ती विधेयकाला काल लोकसभेनंही मंजूरी दिली. या विधेयकाद्वारे साथ रोग कायदा १८९७ मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्यात आलं आहे. तसंच, साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकारांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना इजा पोहचवणं आणि त्यांच्या जीवाला धाेका निर्माण करणं हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. असा गुन्हा करणाऱ्याला तीन महिने ते पाच वर्ष तुरुंगवासाच्या आणि ५० हजार ते २ लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे.
