अकोल्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेआधी मंडप कोसळला
अकोला : आज अकोलामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण प्रचारसभा सुरू होण्यापूर्वीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मंडप कोसळल्याने मुख्यमंत्र्यांची सभा होईल की नाही याबद्दल साशंका व्यक्त केली जात होती.
अकोल्यात आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा सुटल्याने मंडपाचा मोठा भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, सभेला काही काळच उरलेला असताना मंडप कोसळल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. दुपारी तीनच्या सभेपर्यंत पुन्हा हा मंडप उभारणे शक्य नसल्याने ही सभाच रद्द होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
अकोल्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या सभेची उत्सुकता शिगेला पोहचली असताना अचानक मंडप कोसळल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालं
अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत.
