अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्ते दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी तरुणाचे आमरण उपोषण
अकोला/तेल्हारा, दि.२८: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक लोकांना आपल्या प्रणालाही मुकावं लागलं आहे. सदर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. अखेर या साऱ्या विरोधात जागरूक रहिवाशी विशाल नांदोकार दिनांक २६ जून पासून तेल्हारा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालया बाहेर उपोषणास बसले आहेत. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणामुळे विशाल नांदोकार यांची प्रकृती ढसाळली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली आहे. या उपोषणाला मोठा प्रतिसाद लाभत असून या ठिकाणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवृंद व एसटी महामंडळ चे कर्मचारी आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या शिवाय विद्यार्थी व कृषि व्यवसायिक इत्यादी सर्वांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. अखेर उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंत्यांनी भेट देऊन नांदोकार यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केरत रस्त्याचे काम १५ जुलैपासून लगेच सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतू या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तो पर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला.
मॉन्सून चं आगमन होऊन महिनाही उलटला नाही आणि रस्त्यांची दुर्दशा होतेय, हे नक्कीच भूषणावह नाही. सार्वजनिक बांधकाम खातं आणि कंत्राटदार यांच्या खाबूगिरीमुळे रस्त्यांची मूलभूत बांधणीच निकृष्ट दर्जाची केली जातेय ज्याकडे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
Credits : शुभम पवार, तेल्हारा
